Tuesday, April 28, 2020

रागचक्र

रागचक्र 
या कवितेतून मी शास्त्रीय संगीतातील विविध रागांच्या संगतीने दिवस कसा घालवावा, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक रागाचे नाव हे दिवसातील त्या रागाच्या वेळीच गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.
पण काही ठिकाणी काव्यवृत्तात बसवण्यासाठी रागवेळेबद्दल थोडी मुभा घेतली आहे.
जाणकारांनी ती माफ करावी.


भैरवाच्या भक्तिभावे आसमंता जाग यावी,
तोडी अन् आसावरी वैराग्यभावे आळवावी.


सूर्यबिंब उदयास यावे घेउन ललित स्वरावली,
सचैल मग ते स्नान व्हावे गात राम अन् गुणकली.


देसकारे गात घ्यावा न्याहारीस उपमाच तो,
कान माझे तृप्त व्हावे ऐकुनी हिंडोल तो.


काम करण्या मग निघावे ऐकुनी रे शंकरा,
वाजवूनी राग देसी रागिण्या याव्या घरा. 


तप्त त्या दूपारसमयी आसनी मग बैसुनी,
भोजनी या ऐकु यावा सारंग तो वृंदावनी.


ताक पिउनी एक मग तो मस्त द्यावा ढेकर,
भूप राग ऐकीत यावी वामकुक्षी लवकर.


तासाभराने जाग यावी ऐकुनी केदार तो,
हमीर रागे रंग यावा कशायपेयपानास तो.


सांजेस त्या सुरुवात व्हावी शुद्ध कल्याण श्रवूनी,
ॠषभ कोमल मारव्याचा हुरहूर आणी मनी.


संधिकाल होऊन गेल्यावरी वाजवुन बासरी,
श्यामकल्याणास गाऊन व्हावी राधा बावरी.


अवीट यमनाच्या स्वरांचे मज अंगणी चांदणे,
शिंपडावे हेच त्या स्वरचंद्रास आहे मागणे.


धूप नंदादीप लावावा आता देवालयी, 
बिहागरागाच्या स्वरांची दीप्त पणती मृण्मयी. 


भोजनी मग ऐकु यावा धुंद स्वर बागेश्रीचा, 
पान खातानाच यावा सूर तो पटमंजिरीचा.


सूर चंद्र-मधुकंसीचे ते रात्रीला दरबारी यावे,
कुरुवाळुन हंसध्वनीने नयनपटल मग बंद व्हावे.


-- सौरभ जोशी

No comments:

Post a Comment