Tuesday, March 31, 2020

(अ)समर्थ (आ)रामदासकृत हल्लींच्या भोगवादी जीवनशैलीवर काही श्लोक

हल्लींच्या भोगवादी जीवनशैलीवर समर्थ रामदासांच्या शैलीत (अ)समर्थ (आ)रामदासकृत काही श्लोक...

सदा सर्वदा मॅकडी पंथेची जावे l
बर्गर फ्रँकीज दाबूनि खावे  ll
जिव्हेवरी फक्त पिझ्झा वसावा l
प्रभाते मनी डॉमिनो रे भजावा ll

वरचेवरी बारमध्येचि जावे l
विक्षेपुनी देह झिंगोनि यावे ll
खंब्यामधोनि मुखी पेग घ्यावा l
प्रभाते मनी किंगफीशर भजावा ll

पहावीच टी.व्ही.वरी आय.पी.एल. l
घालवून वाया अमूल्य वेळ ll
चिअरगर्ल्सचा डान्स नयनी पहावा l
प्रभाते मनी 'गेल' चिंतीत जावा ll

सदा सर्वदा ते हॉटेलिंग करावे l
घरचे त्यजोनी बाहेर खावे ll
ऐसा स्वदेहा विषभार द्यावा l
प्रभाते मनी तो झोमॅटो भजावा ll

सदा शुक्रवारी पारटीस जावे l
झिंगाटदंगे रात्री करावे ll
निजकर्णपटला असा त्रास द्यावा l
प्रभाते मनी फक्त डी.जे. भजावा ll

सदा भाक्ति मायकेल जॅक्सनी धरावी l
सदा प्रीति जस्टिन बायबरी असावी ll
मना सत् चिदानंद सोडोनि द्यावा l
मना वीषयानंद जीवी धरावा ll

-- सौरभ जोशी [ (अ)समर्थ (आ)रामदास ]

ताल थेंबांचे वाजती

ताल थेंबांचे वाजती

आला आला पावसाळा, ताल थेंबांचे वाजती,
वृक्षवेली गाणे गाती, हाती घेऊनिया मोती.

बहरला आसमंत, त्याला हिरवी झालर,
दर्या-खोरी पांघरती, शुभ्र धुक्याची चादर.

रानीवनी पानोपानी आला हिरवा बहर,
धरणीच्या मनगटी,लागे मृद्गंधी अत्तर.

धबधबे कोसळती,उड्या मारून खालती,
गार वार्याच्या गाण्याला,फेसाळत दाद देती.

उधाणल्या मनातून, एक अबोल चाहूल,
भिजतानाच दिसावे, तिचे नाजुक पाउल.

शहारले अंग कसे, थेंब घेउन कवेत,
मनातली सय तिची, ओली झाली ग फुलांत.

-- सौरभ जोशी

चक्रम समरकँप २०१६

चक्रम समरकँप २०१६

चला चला लागा कामाला,
समरकँप रे आला आला.

साद घालती किल्ले सारे,
चक्रमांना म्हणती या रे.

किल्ले म्हणती लवकर या रे,
खुले करितो दरवाजे सारे.

बेलाग कडा अलंग-मदनाचा,
किंवा आसरा कुलंग गडाचा.

वाघ दरवाजा रायगडाचा,
वा टॉप तो आजोबाचा.

कुठे करावा, कसा करावा,
चर्चा करुनी लवकर ठरवा.

झटकून सारी सारी मरगळ,
कर 'सापा' रे लवकर वळवळ.

लाव कामाला समरकँपच्या,
उत्साही गड्यांना चक्रमच्या.

पहा समय रे थोडा आता,
मे चा महिना येईल आत्ता.

सह्यांकनच्या यशानंतर,
समरकँपचे लावू अत्तर.

पुन्हा करूया मस्त धमाका,
'चक्रम'चा रे लावून शिक्का.

-- सौरभ जोशी

घालु कोरोनावरती घाला

घालु कोरोनावरती घाला


नको कोरोना या विश्वाला
किती जिवांना घेउन गेला,
घरीच बैसुन करू निश्चया 
घालु कोरोनावरती घाला ll १ ll


नियमांचे या करून पालन
करू सहकार्य प्रशासनाला,
चित्तांतुनी दृढ विश्वास राहू दे
घालु कोरोनावरती घाला ll २ ll


परिचारिका अन् वैद्य बंधु ते
सेवा करिती क्षणाक्षणाला,
कृतज्ञ राहुन तयांप्रती मग
घालु कोरोनावरती घाला ll ३ ll


सुन्न शांतता चोहिकडे ही
"ओ" द्या पक्षांच्या सादेला,
"लॉक डाऊन"चे करून पालन
घालु कोरोनावरती घाला ll ४ ll


घरी बैसणे उत्तम संधी
निजचैतन्या अनुभवण्याला,
छंद-कला त्या घरी जोपासुन
घालु कोरोनावरती घाला ll ५ ll


जग हे सुंदर आहे त्यावर
टिकू न देऊ त्या कोरोनाला,
अखिल जगाच्या मुठी आवळुन
घालु कोरोनावरती घाला ll ६ ll


"सर्वे सन्तु निरामया:"
वचन हे बोला हो बोला,
करून गुंजन पसायदाने
घालु कोरोनावरती घाला ll ७ ll


मनांत भीती मुळी नको ती
आठवा जय जय रघुवीरा,
समर्थवचना स्मरून नक्की 
घालु कोरोनावरती घाला ll ८ ll


-- सौरभ जोशी

कृष्णाची आरती - पद्यानुवाद

मुरलीधर मेघश्यामाची l आरती कृष्णकन्हैय्याची ll

कृष्ण मथुरेत जन्मलासी l
नंदगृहि लीला केल्यासी l
यशोदा रत्नभूषणाची l आरती कृष्णकन्हैय्याची ll

कृष्ण यशोदेच्या लाडाचा l
बंधू  झालासि हलधराचा l
रानीच्या गोधनपालाची l आरती कृष्णकन्हैय्याची ll

कृष्ण तू कंसाला वधिले l
भूमिचे विघ्न दूर केले l
कालिया दर्पमर्दकाची l आरती कृष्णकन्हैय्याची ll

कृष्ण तू अर्जुनासि प्रिय रे l
श्याम तू भक्तरक्षका रे l
यमुनातटी रासखेळियाची l आरती कृष्णकन्हैय्याची ll

आरती गाई कृष्णानंद l
मनी होतसे अत्यानंद l

विनये पूजा तव चरणांची l आरती कृष्णकन्हैय्याची ll

-- सौरभ जोशी

स्वातंत्र्यदिनानिमित्त पडलेले काही अनुत्तरीत प्रश्न


स्वातंत्र्यदिनानिमित्त पडलेले काही अनुत्तरीत प्रश्न

(ही कविता काही वर्षांपूर्वी केली असल्याने त्यात काही तात्कालिक संदर्भ आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.)

चौसष्ट वर्षांपूर्वी
स्वातंत्र्याची पहाट उगवली,
दीडशे वर्षांच्या गुलामीतून
भारताची सुटका झाली.
पण,
मायभूमीचे सोनेरी वैभव परत आपल्याला मिळेल का ?
वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला जल्लोष स्वातंत्र्यदिनी होईल का ?

फाळणी झाली, युद्धे झाली,
दंगे झाले, बॉंबस्फोट झाले,
तंत्रज्ञानाच्या शक्तीने
भारतीय यान चंद्रावर गेले.
पण,
कर्जबाजारी शेतक-याला प्राणज्योत दिसेल का ?
वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला जल्लोष स्वातंत्र्यदिनी होईल का ?

दिल्लीतील राजपथावर
संचलने होतील,
राजकीय नेते ती
काचेतून पाहतील.
पण,
भ्रष्टाचाराच्या गर्तेतून भारत बाहेर येईल का ?
वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला जल्लोष स्वातंत्र्यदिनी होईल का ?

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही
सार्वजनिक सुट्टी येईल,
आणि मॉल्समधील थिएटर्स,
तुडुंब भरून जातील.
पण,
टिळक, नेताजींच्या त्यागाची आठवण तरी होईल का ?
वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला जल्लोष स्वातंत्र्यदिनी होईल का ?

शाळा-महाविद्यालयांमध्ये
ध्वजारोहणाचे सोहळे होतील,
वंदे मातरम् आणि राष्ट्रगीताच्या
मोठ्या गर्जना होतील.
पण,
सवरकरांची राष्ट्रनिष्ठा कधी आपल्यात रुजेल का ?
वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला जल्लोष स्वातंत्र्यदिनी होईल का ?

अहिंसा आणि सत्याग्रहांची
पुन्हा एकदा उजळणी होईल,
फडकणा-या तिरंग्याबरोबर
महात्म्यांनाही सलाम होईल.
पण,
भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंचे स्मरण तरी होईल का ?
वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला जल्लोष स्वातंत्र्यदिनी होईल का ?

- सौरभ जोशी


शूर आम्ही…


शूर आम्ही…

"शूर आम्ही सरदार …" हे गाणं शांताबाईंनी शिव-राज्याला अनुसरून अप्रतिम लिहिलं. पण तेच जर आजच्या "आदर्श" राज्य कारभाराला अनुसरून लिहायचे झाल्यास असेच लिहावे लागेल…!!

शूर आम्ही आमदार आम्हाला काय कुनाची भीती,
पैसा, खुर्ची अन सत्तेसाठी प्रान घेतलं हाती,
शूर आम्ही आमदार आम्हाला काय कुनाची भीती   ll धृ ll

सत्तेच्या कैफात उमगली घोटाळ्यांची रीत,
खुर्चीसंगे लगीन लागलं जडली येडी प्रीत,
लाल दिव्यांच्या गाड्यांमधुनी अमुची भित्री छाती,
पैसा, खुर्ची अन सत्तेसाठी प्रान घेतलं हाती,
शूर आम्ही आमदार आम्हाला काय कुनाची भीती   ll  ll

काम करता 'खावं-प्यावं', हेच आम्हाला ठाव,
'पिऊन' निजावं, उठूनच 'खावं', हेच आम्हाला ठाव,
स्वार्थासाठी सारी विसरू लाज-शरम अन नीती,
पैसा, खुर्ची अन सत्तेसाठी प्रान घेतलं हाती,
शूर आम्ही आमदार आम्हाला काय कुनाची भीती   ll  ll

-- सौरभ जोशी
टीपवरील कवितेतील कुठल्याही शब्दाचे वास्तवाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.