Tuesday, March 31, 2020

सद्गुरु माउली श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या जन्मदिनानिमित्त


त्रैलोक्याधिपती, त्रिगुणात्मक, कृपासिंधु, करुणासागर, भक्तवत्सल, दीनानाथ, परमसमर्थ, सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा जन्मदिन सद्गुरु माउली श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या चरणी हे काव्यपुष्प अर्पण.

कृपासिंधु नरसिंह सरस्वती जगद्गुरु माउली,
अखिल जगावर दीनानाथा, धर मायेची साउली.

एकटाच मी होतो जेव्हा अबोल होत्या दिशा,
पदाम्बुजी तव घेउनि मजला दाखविलीस सोन उषा.

गिरिवनाच्या भूमीवरती उभविलेस नंदनवन,
निमित्त मजला केलेस त्याते, भरून आले माझे मन.

ध्यानमंदिरी तव इथल्या जमले आज सारे भक्त जन,  
दिव्यानंदे ओले होती आज पहा मम नयन.

शिम्पवतोस धन संस्कारांचे बालमनांच्या पटलांवरती,
अशीच व्हावी अविरत सेवा, इच्छा मम तव चरणापुढती

सत्कार्यांच्या तटानमधुनी वाहविलीस मम सरिता,
आज तुझ्या या जन्मदिनी कृतकृत्य जाहलो आता.

तवप्रसादे सफल होवो भक्तजनांच्या मनोकामना,
गुणगान गावे तुझे कितीही, मम समाधान होईना.

तुझ्या कृपेचा वज्रलेप हा भक्तांवर राहू दे,
आनंदाची उष:प्रभा उगवून सदा राहू दे.

-- सौरभ . जोशी.

पहिला पाऊस

पहिला पाऊस

लखलख आभाळात,
बसे लपून चांदवा l  
पहिल्याच पावसाचा,
भिडे अंगाला गारवा. ll

वैशाखात भाजलेल्या,
साऱ्या आसमंतावरी l 
शिंपी नाजूक ओलावा,
अन चैतन्याच्या सारी. ll 

धडधडा गडगडा ,
वाजे आभाळी नगर l 
मायधरेच्या अंगणी,
 फुले मोराचा पिसारा. ll 

नेई मृदगंध वाहून,
कसा भणाणता वारा l 
मोदेभरल्या थेंबांत,
अन अंगावरी शहारा. ll 

नभातून धरेकडे,
लागे मोत्यांची पंगत l 
दऱ्या डोंगरामधुनी,
पाणी दिसले रंगात. ll 

काळ्या उजाड मातीला,
आता पाजले अमृत l 
उमलेल गर्भातून तिच्या,
हिरवी पालवी डोलत. ll 

-- सौरभ जोशी 

दशप्राणांची ज्योत निमाली

सियाचेनमध्ये आपले देशसेवेचे कर्तव्य चोखपणे बजावत असताना झालेल्या नैसर्गिक अपघातात स्वप्राणांची आहुती देणार्या त्या दहा सैनिकांना माझी काव्यरूप श्रद्धांजली...!!

सियाचेनच्या दुर्गम भूमी
दहा व्यग्र ते सैनिक कामी.


किती ओझे ते पाठीवरती,
वजनदार ती बंदूक हाती.


उंच हिमाच्या शिखरांवरती,
करडे डोळे गस्त घालती.


करुनि छातीचा अभेद्य कोट
रक्षित होते मायभूमीतट.


तापमान ते किती विचारा,
शून्याखाली सदैव पारा.


काय अन्न अन् काय निवारा,
शरीरावर बर्फाचा मारा.


कशाचीच ना करता पर्वा,
देश रक्षणे अखंड सेवा.


अन् अचानक घात जाहला,
बर्फाचा तट निखळुन आला.


वेग तयाचा किती भयंकर,
क्षणात कापीत आला अंतर.


त्याच्या वाटे जे जे आले,
निर्दयतेने त्याने गिळले.


परी कर्तव्याला जागत होते,
भारतभूचे दहा पुत्र ते.


मुळीच ना रे ते डगमगले,
झुंज तटाशी देते झाले.


लढवय्यांचे वज्रदेह ते,
अडकून गेले बर्फतटांते.


साद तयांची ऐकायाला,
कुणीच नव्हते त्या वेळेला.


असहाय होऊनी दहा जीव ते,
क्षणाक्षणाला गोठत होते.


रक्ताचे ना ओघळ दिसले,
रक्त शरीरी गोठून गेले.


अखेर मग दुर्दैवी झाली,
दशप्राणांची ज्योत निमाली.


वैश्वानर तो शौर्याचा,
वैश्वानर तो धैर्याचा,

वैश्वानर तो त्यागाचा,
चटका लावून हृदयाला,

हिमउदरी बघ शांत जाहला,
हिमउदरी बघ शांत जाहला.

-- सौरभ जोशी

सरता ज्येष्ठ महिना

सरता ज्येष्ठ महिना

सरता ज्येष्ठ महिना..

परत वर्षा ऋतु..

परत मृद्गंध..

परत तेच भीमसेनजी..

परत तोच मियाँ मल्हार..

परत तेच करीम नाम तेरो..

तोच आवाज..

तोच गळा..

तेच शब्द..

तेच स्वर,

तोच नाद..

तोच राग..

तेच आरोह..

तेच अवरोह..

तोच दम..

तोच ताल..

तीच सम..

तोच काल..

तीच टाळी..

तेच खंड..

तेच आवर्तन..

पण..पण..पण..

नवीन रंग..

नवीन गंध..

नवीन तेज..

नवीन चैतन्य..

नवीन स्वप्नं..

नवीन श्वास..

नवीन ध्यास..

नवीन पालवी..

नवीन सळसळाट..

नवीन मेघ..

नवीन थेंब...

नवीन आंदोलनं..

नवीन झुळुका..

नवीन वारे..

नवीन धुंदी..

नवीन दाद..

नवीन अनुभूती..

...आणि अलौकिक चिदानंद..आत्मानंद...


-- सौरभ जोशी

विडंबन - प्रभाती सूर नभी रंगती

समस्त नवरा जातीचे रविवार सकाळचे मनोगत मी विडंबनात्मक पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. (चाल - प्रभाती सूर नभी रंगती..)

प्रभाती जांभया येती, दशदिशा "झोपा रे" म्हणती...ll धृ.ll

फरशीवरती चहा सांडवीत, बायको आपुली असते तंद्रीत l
जागी होऊन मुले अखंडीत, कोलाहल करती ll १ ll धृ.

अर्धांगिनीची बोंब ऐकुनी, जागा होतो धडकी भरुनी l
मग ती अपुल्या तार स्वरांनी, कानाशी कोकली ll २ ll धृ.

क्रोधितवदने माझ्याकडुनी, भांडी घासवी लाटणे मारुनी l
कामवालीचे नाम स्मरोनी, करितो मग आरती ll ३ ll धृ.

-- सौरभ जोशी

मला भावलेला राग मिया मल्हार

मला भावलेला राग मिया मल्हार

पाऊस सुरू झाला की मियाॅ मल्हार ऐकायला मी नेहमीच आतुरलेला असतो. कालंच पं.व्यंकटेश कुमारांचा आणि त्यानंतर स्व.वीणाताईंचा मियाॅ मल्हार ऐकला...आणि मियाॅ मल्हाराच्या स्वरूपानुरूप खालील ओळी पाझरल्या...मियाॅ मल्हारात जे शुद्ध-कोमल स्वर येतात, त्यांचा स्वभावधर्म दाखवण्याचा, आणि मियाॅ मल्हार ऐकताना माझ्या मनाला जसा पाऊस भावतो, त्याचे काव्यमय वर्णन करण्याचा हा छोटा प्रयत्न....

पाऊसधारा बरसत आल्या
थेंब टपोरे बहु ओघळले l
मोदेभरल्या मृदगंधातुन
मल्हाराचे स्वर पाझरले ll

दो षड्जांच्या कमानीतुनी
शुद्ध-कोमले स्वर अवतरले l
सात स्वरांना खेळायाला
मध्य सप्तकी अंगण केले ll

ऋषभस्वर तो रुसून बसला
म्हणे न येत मी खेळायाला l
प्रेमभरे समजुत काढाया
षड्जस्वर तो मागे बसला ll

मध्यमस्वरे उधाण आले
कृष्णमेघ ते बहु गडगडले l
सप्तस्वरांचे इवले अंगण
क्षणात ओले चिंब जाहले ll

गंधाराचे गुंजन करिता
अंगावरुनी ओल शहारा l
हिरमुसलेल्या चित्तामधुनी
फुंकून गेला नवाच वारा ll

पंचमस्वरे वनांत कोकीळ
मधुस्वरे रे कुहू बोलला l
अवखळशा त्या बाळझर्याला
नाद खळखळा देऊन गेला ll

मध्यमस्वरा पंचम चुंबून
निषाद कोमला पुढे स्पर्शला l
निषाद कोमल जाता जाता
विरहाची सल ठेऊन गेला ll

गूढगम्यता वातावरणी
डोंगरांतुनी होती दाटली l
शुद्ध धैवती पवन वाहिला
नकळत कैशी विरून गेली ll

शुद्ध निषादे चैतन्याचे
प्रपात दर्शन देते झाले l
मल्हाराच्या सप्तसुरांचे
इंद्रधनु मम मनी उमटले ll

-- सौरभ जोशी