पावन झाली घोडखिंड-कासारी
प्रसंग होता बाका, संकटवेळ,
हाती नव्हता दवडायला वेळ.
शत्रुफौज होती कित्येक हजारी,
माघारी फिरली नाही मराठी स्वारी.
मुळीच ना डगमगला प्रभु तो बाजी,
काहूर उठवले सिद्दीफौजेमाजी.
नरसिंह शिवा पोचणे विशाळगडाला,
हा एकच होता ध्यास मर्द बाजीला.
समशेर उठे बाजींच्या म्यानातून,
जणु सौदामिनीची लखलख देहातून.
वाट रोखली करूनि छातिचा कोट,
वाहती किती रुधिराचे असंख्य पाट.
किती घाव झेलले बाजींनी देहावरती,
पोचला शिवा सुखरूप विशाळावरती.
धडधडा जाहले तीन बार तोफांचे,
हर्ष पावले कान दोन बाजींचे.
विच्छिन्न जाहली तटबंदी बाजींची,
देह ठेवला स्वराज्य यज्ञा काजी.
अमरत्व पावली बाजीप्रभूंची स्वारी,
पावन झाली घोडखिंड-कासारी.
No comments:
Post a Comment