Tuesday, March 31, 2020

जगायचं कसं कळत नाही...

जगायचं कसं कळत नाही...

गजबजलेल्या मुंबईत जगायचं कसं कळत नाही.
सरकारी लांडगे
जनतेच्या पैशावर लोळतात,
.सी. चकाचक गाड्यांमधून
गावभर हिंडतात.
LET आणि IM मग
सहज धमाका घडवतात,
कष्टणारे निरागस जीव मात्र
आगीत हकनाक होरपळतात.
बॉंबस्फोटांची मालिका थांबता थांबत नाही,
गजबजलेल्या मुंबईत जगायचं कसं कळत नाही. ll १ ll 

तपासयंत्रणांचे जाळे
धमाक्यानंतर पसरते,
मेणबत्त्यांचे दिवे लावून
जनता निषेध नोंदवते.
दहशतवादी सुखाने
मजा बघतात,
सरकारी गेंडे थंडपणे
कंट्रोल रूम मधून परिस्थिती पाहतात.
हाय ऍलर्टची घोषणा धमाका झाल्याशिवाय होत नाही,
गजबजलेल्या मुंबईत जगायचं कसं कळत नाहीll २ ll

मिडिया चे चर्वण मग
टि.व्ही. वर सुरु होते,
टी.आर.पी. वाढवण्यासाठी
त्यांच्यात र्स्पर्धा जुंपते.
मुंबईच्या हाय स्पिरिटच्या
वल्गना होतात,
मृतांच्या नातेवाइकांना
मदती जाहिर होतात.
दहशतवादाचा सामना करूअशी मिळते सरकारी ग्वाही,
गजबजलेल्या मुंबईत जगायचं कसं कळत नाहीll ३ ll

दहशतवाद्याला काही दिवसांनी,
पोलिस आणि सी.बी.आय. पकडतात,
अमर आणि मुलायम मात्र
मानवाधिकाराच्या गप्पा मारतात.
अफझल च्या फाशीची फाइल
लालफितीत बरबटते,
आणि कसाब च्या वाढदिवशी
अजून एक बॉंबस्फोटांची मालिका घडते.
साक्षी पुरावे पडताळण्यात आरोपीला शिक्षा कधीच होत नाही,
गजबजलेल्या मुंबईत जगायचं कसं कळत नाहीll ४ ll

पुढील हल्ल्याची योजना,
दहशतवादी आता करू लागले असतील,
आपले मंत्री-संत्री मात्र
दौरे करण्यात रमतील.
जनतेचा प्रक्षोभ
एस्.एम्.एस्. मधून चार दिवस दिसेल,
स्वतःच्या रहाटगाडग्यात ती
पुन्हा एकदा गुरफटेल.
पुढील धमाक्याची स्फोटके कधी आणली गेली, हे कळणारंही नाही,
गजबजलेल्या मुंबईत जगायचं कसं कळत नाहीll ५ ll

आता वेळ आलीय
जनतेनेच रस्त्यावर उतरायची,
निर्लज्ज राजकारण्यांना
कडक धडा शिकविण्याची.
सतत सजग राहून
एकजुटीने रहायची,
चला करु प्रतिज्ञा
दहशतवाताविरुद्ध लढण्याची.
मतपेटीतून क्रांती जर घडवली नाही, तर,
जगायचं कसं? हे कधीच कळणार नाहीll ६ ll

- सौरभ जोशी

No comments:

Post a Comment