ब्रह्मदेवाने पाहिलेली लोकसभा
(ही बऱ्याच वर्षांपूर्वी केलेली कविता असल्याने त्यात काही तात्कालिक संदर्भ आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.)
परवा एकदा ब्रह्मदेव नवी दिल्लीत आला,
संसदेतलं कामकाज पाहून विस्मयचकित झाला.
कारण फार मजेशीर होतं, लोकसभेत गोंधळच नव्हता,
प्रत्येक मंत्री शांततेनं आपापलं काम करत होता.
ब्रह्मदेवाला वाटलं काहीतरी नक्कीच गडबड आहे,
त्यानं बाहेरच्या गार्ड ला विचारलं, "ही काय भानगड आहे?"
(गार्ड म्हणाला) 'सचोटीने काम करा' असा मंत्र्यांचा साप्ताह आहे,
अभ्रष्टाचारी पद्धतीने जनसेवा करण्याचा ठराव पास झाला आहे.
हे ऐकून ब्रह्मदेवाला आनंदाचं भरतं आलं,
काही क्षण त्यालाच आपण स्वर्गात असल्यासारखं वाटलं.
लोकसभेत कुठलेच नेते अकार्यक्षम उरले नव्हते,
खासदारांच्या कामाचं मूल्यमापन पंतप्रधान करत होते.
संपूर्ण लोकसभेत इटालियन बाई कुठे दिसत नव्हती,
घराणेशाही जाऊन लोकशाही मुरलेली दिसत होती.
मतदानाची प्रक्रिया पूर्ण वेब बेस्ड झाली होती,
बहुमातातल्या पक्षाला युतीची गरज उरली नव्हती.
जयाताई पायात चक्क खडावा घालून आल्या होत्या,
जनसेवेसाठी फंडिंग म्हणून त्यांनी आपल्या साड्या विकल्या होत्या.
देशमुखांची पाटीलकी 'आदर्श' झाली होती,
उंची कपडे घालण्याची ईच्छा शिवराज ना उरली नव्हती.
शेतीविकासाचं नियोजन पवार क्रिकेट सोडून करत होते,
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांबद्दल अश्रू ढाळत होते.
सुषमाताई कुठलीही 'आड-वाणी' करत नव्हत्या,
'ब्यानर्जीं' चा ही सगळ्याला 'ममते'नं पाठींबा होता.
विकासकामे मोठ्या वेगाने मार्गी लावली जात होती,
स्विस ब्यांकेतील सारी रक्कम त्यावर खर्ची होत होती.
गुंड-मवाली-माफिया लोकसभेत कुठेच दिसत नव्हते,
"चारा फक्त गुरांनाच देईन" अशी घोषणा खुद्द लालू करत होते.
देशद्रोही दहशतवाद्यांना कठोर शासन होत होते,
मानवाधिकाराच्या गप्पा मारून कुणी 'मुलायम'पणा दाखवत नव्हते.
भ्रष्ट खासदार स्वत: ला शिक्षा व्हावी अशी विनंती करत होते,
राजाभाऊ कलमाडी स्वत:हून तुरुंगात गेले होते.
अण्णांची पावलं खासदार आदरानं धरत होते,
जनालोकपाल बिल लवकर आणण्याचा आग्रह ते अण्णांनाच करत होते.
हे सारं पाहून ब्रह्मदेव मनोमन आनंदला,
खासदारांचं अभिनंदन करण्यासाठी तो पुढे सरसावला.
तोच एका खासदाराचं ब्रह्मदेवाकडे लक्ष गेलं,
ब्रह्मदेवाने त्याचं हात धरून कौतुक केलं.
हस्तांदोलानाच्या गचक्यानं ब्रह्मदेव खडबडून जागा झाला,
आपण जे पाहत होतो ते स्वप्न होतं, याचा त्याला
उलगडा झाला.
चहा पीत वर्तमानपत्रातला वाचला त्याने मथळा,
"खासदाराने केला होता एक बेहिशेबी घोटाळा."
टीप: वरील कवितेतील कुठल्याही व्यक्तीचे, नावाचे, स्थानाचे अथवा घटनेचे वास्तवाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-- सौरभ जोशी.
No comments:
Post a Comment