पृथ्वी, सूर्य
आणि पावसाळा
खालील कवितेमध्ये पावसाळी वातावरणाचे रुपक घेउन पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील प्रेमळ नातं कथन करण्याचा मी प्रयत्न केला आहे. कवितेनंतर आशय दिला आहे. कविता तीन वृत्तांमध्ये केलेली आहे. प्रत्येक कडव्याच्या सुरुवातीला त्या वृत्ताचे नाव दिले आहे.
कविताः-
(वृत्त – शिखरिणी)
धुक्याच्या रे शाली, धवल दिसती उंच अचली,
पहा ल्याली पृथ्वी, हरिततृणमाला मखमली.
प्रपातांच्या धारा, पडति धरणीच्या करतली,
सजे सृष्टी कैशी?, जणु नववधू आज नटली.
(वृत्त – भुजंगप्रयात)
उतावीळ होई पहाटे उठोनी,
पहाण्या तिला ये क्षितीजावरोनी.
धरू मेदिनीला सुखे बाहुपाशी,
अशी कामना तो करोनी मनाशी.
(वृत्त – मालिनी)
दिनकर उठला जो, पावसाळी प्रभाती,
हुरहुर बहु लागे, ना दिसे प्रेयसी ती.
विरह मग तयाच्या, जाळितो सर्व पेशी,
प्रखर किरणराशी, लुप्त झाल्या प्रदेशी.
(वृत्त – भुजंगप्रयात)
सवे घेउनी कुंद त्या मेघमाला,
पळू लागला धुंद सोसाट वारा.
दिसू लागली जी धरित्री सुशीला,
मनी जाहला मोद त्या भास्कराला.
- सौरभ जोशी.
कवितेचा थोडक्यात आशयः-
सूर्य आणि पृथ्वी हे जणू प्रियकर आणि प्रेयसी आहेत. पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवंगार झालं आहे, धुक्यानं सारा आसमंत व्यापला आहे आणि धबधबे कोसळू लागले आहेत. हा सारा साज चढवून पृथ्वी जणुकाही एखाद्या नववधू प्रमाणे नटली आहे.
अशा या नटलेल्या पृथ्वीला (प्रेयसीला) कधी एकदा पहातोय, या कल्पनेनं सूर्य (प्रियकर) उतावीळ होउन लवकरंच पहाटे उठला आहे. तो मनात म्हणतोय की लवकरंच क्षितिजावर येवून मी माझ्या प्रेयसीला (पृथ्वीला) किरणांच्या बाहुपाशात घेईन.
पण उगवल्यावर सूर्याला पृथ्वी दिसतंच नाही, कारण ती धुक्याच्या दुलईत लपलेली असते. त्यामुळे त्याला अगदी हुरहुर लागते आणि तो विरहव्याकुळ होतो. इतका की, त्याचे प्रखर किरणदेखील लुप्त होउन जातात. (पावसाळ्यात धुक्यामुळे सूर्यकिरण दिसत नाहीत, हा संदर्भ.)
मग काही वेळानं सुसाट वारा वाहु लगतो आणि स्वतःबरोबर धुक्याला घेउन जातो.
वा-याने धुकं ओसरतं आणि सूर्याला त्याची प्रेयसी (पृथ्वी) हळुहळु दिसू लागताच तो अतिशय आनंदित होतो.
No comments:
Post a Comment