Tuesday, March 31, 2020

जीवन म्हणजे......


जीवन म्हणजे......
जीवन म्हणजे खूप काही खास असतं,
आईनं भरवलेल्या तूप-मेतकूट भाताचा घास असतं.
जीवन म्हणजे थोडा नाठाळपणा  ही असतं,
आईचा डोळा चुकवून डब्यातला बेसनाचा लाडू खाणं असतं.
जीवन म्हणजे देवटाक्यातल्या पाण्यासारखं संजीवन असतं,
कसोटीच्या क्षणी बाबांनी धीरोदत्त शब्दांनी दिलेलं बळ असतं.
जीवन म्हणजे अमूल्य संस्कारांचं लेणं असतं,
तुळशीवृंदावनातील दिपाज्योतीसमोर 'शुभंकरोती' म्हणणं असतं.
जीवन म्हणजे आठवणींची फुलं शालजोडीत ठेवणं असतं,
आजीनं करून ठेवलेल्या लिंब-लोणच्याची फोड वर्षानुवर्ष पुरवणं असतं.
जीवन म्हणजे जात्यावरच्या ओव्या पडवीत बसून ऐकणं असतं,
आणि आजी अंघोळ केल्यावर सोवळ्याने म्हणत असलेले श्लोक नकळत पाठ करणं असतं.
जीवन म्हणजे बालपणी केलेलं पाठांतर असतं,
दिवेलागणीस झोपाळ्यावर बसून आजोबांसमोर परवचा म्हणणं असतं.
जीवन म्हणजे मोठेपणी बालपण जपणं असतं,
खूप दिवसांनी भेटलेल्या बालमित्राला शिव्या देत मिठी मारणं असतं.
जीवन म्हणजे कधी कधी लाज सोडून वागणं असतं,
आमराईत बसून आंबे खात तोंड आणि कपडे माखवणं असतं.
जीवन म्हणजे मागे पुढे पाहता झोकून देणं असतं,
कोसळत्या धबधब्यात उभं राहून स्वत:चीच पाठ बडवून घेणं असतं.
जीवन म्हणजे भीमसेनजींचा तोडी ऐकत पहाटे उठणं असतं,
आणि राजगडाच्या संजीवनी बुरुजावरून वसंतरावांचा मारवा ऐकत सूर्यास्त पाहणं असतं.
जीवन म्हणजे थोडा वेडेपणा करणं असतं,
पेटी-तबला घेऊन गिरिदुर्गांच्या कुशीत मैफिल जमवणं असतं.
जीवन म्हणजे रायगडावरील जगदीश्वराच्या गाभाऱ्यात बसून महिम्न म्हणणं असतं,
आणि हरिश्चंद्राच्या  कोकणकड्यावरून  पोवाडे गाणं असतं.
जीवन म्हणजे उत्तुंगतेचं केलेलं पूजन असतं,
हिमालयाकडे पाहत कुमारसंभवाचं केलेलं कूजन असतं.
जीवन म्हणजे अशा सुगंधी क्षणांचा सुवास घेत राहणं असतं,
म्हटलं तर नुसतच जिवंत राहणं असतं, म्हटलं तर क्षण अन क्षण जगणं असतं.

--सौरभ जोशी

No comments:

Post a Comment