Tuesday, March 31, 2020

पाउस आला....


पाउस आला....

आला आला पाउस आला,
सवे घेउनी अंबुदमाला,
नव स्वप्नांचे नवे गान ते,
हिरवाईतुन आळवित आला.

आला आला पाउस आला,
थेंब टपोरे शिंपित आला,
चैतन्याचे नवे तराणे,
प्रपातांतुनी गुंजित आला.

आला आला पाउस आला,
लपंडाव तो खेळत आला,
दवबिंदुंच्या तालावरती,
गाउ लागल्या कातरवेळा.

आला आला पाउस आला,
गंध फुलवुनी नव प्रणयाचा,
लता तरूंच्या नव कलिकांना,
अलगद अलगद चुंबुन गेला.

आला आला पाउस आला,
लुप्त करोनी त्या रविमाला,
शुभ्र धुक्याच्या शालीमध्ये,
कडे कपारी लपवून गेला.

आला आला पाउस आला,
उधाण आले, उठल्या लाटा,
रानांमधुनी बागडणा-या,
भिजून गेल्या गोजिरवाटा.

आला आला पाउस आला,
सप्तरंग ते उधळित आला,
वसुंधरेच्या गोल कटीवर,
इंद्रधनूची जणू मेखला.

आला आला पाउस आला,
आहा! पसरवी मृदगंधाला,
पानफुलांच्या ओटीवरती,
मौक्तिकदाणे ठेउन गेला.

---- सौरभ जोशी


No comments:

Post a Comment