Tuesday, March 31, 2020

गणित चुकले...


गणित चुकले...

गुणाकार रे करण्याऐवजी,
नकळत जर का भागितले,
गणित तुमचे नक्कीच चुकले.

बालपणीचे मुक्त दिवस जर,
अभ्यासातंचं गुरफटले,
गणित तुमचे नक्कीच चुकले.

गोड विहरत्या कलिकांना जर,
बंद कुपीतुन वागवले,
गणित तुमचे नक्कीच चुकले.

साहित्य कलेची वाट सोडुनि,
अंकानाच जर गौरविले,
गणित तुमचे नक्कीच चुकले.

मायबोलीचे पंख छाटुनी,
परभाषांना जर लावियले,
गणित तुमचे नक्कीच चुकले.

बरबटलेले पैसे जेव्हा,
टेबलाखालुन सरकवले,
गणित तुमचे नक्कीच चुकले.

धरणीवरच्या गोड -यांना,
मदिरेने जर बाटवले,
गणित तुमचे नक्कीच चुकले.

कॉंकरीट च्या इमल्यांसाठी,
जंगलांना जर तोडियले,
गणित तुमचे नक्कीच चुकले.

डोंगरातल्या वाटा खोडुन,
खाणकाम जर चालवले,
गणित तुमचे नक्कीच चुकले.

- सौरभ जोशी

No comments:

Post a Comment