Tuesday, March 31, 2020

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हे काव्यपुष्प


'पुरिया' चे स्वर तव 'दरबारी'
भिजते सृष्टी तव 'मल्हारी' l
'बहार' आणी मम चित्ताला,
वंदन माझे स्वरभास्कराला. ll

तव 'यमनाचा' अवीट गोडवा,
'मुलतानी' अन शांत 'मारवा', l
चिर-स्वर-धन दिधलेस आम्हाला,
वंदन माझे स्वरभास्कराला. ll

तुझा जोगिया आणि भैरवी,
रसिकजनांचे नयन ओलवी, l
ईश्वरदर्शन क्षणाक्षणाला,
वंदन माझे स्वरभास्कराला. ll

तव महिमा मी कसा वर्णावा,
तू भास्कर मी खुजा काजवा, l
नि:शब्द करी तो रोज आम्हाला,
वंदन माझे स्वरभास्कराला. ll

गुरुमंदिरी तव अखंड भक्ती,
श्वासांमधुनी अचाट शक्ती, l
आदर्श जाहली अखिल जगाला,
वंदन माझे स्वरभास्कराला. ll

तव वाणीतून 'अभंग' गायन,
नसानसातून विठ्ठल चिंतन, l
मिळे संजीवन अचेतनाला,
वंदन माझे स्वरभास्कराला. ll

सूर तुझा तो नितांत निर्मळ,
परंतु गमतो आता मृगजळ, l
अमृतावरी काळाचा घाला,
वंदन माझे स्वरभास्कराला. ll

मैफिल ही तव आयुष्याची,
नियतीने संपविली का चि? l
दर्शन दे या तव भक्ताला,
वंदन माझे स्वरभास्कराला. ll

-- सौरभ जोशी


No comments:

Post a Comment