.........., आणि सांग मला....
गिरिदुर्गांच्या तटबंद्यांना
जरा एकदा बिलगून बघ,
बुलंद बुरुजांच्या चिलखती चि-यांना
फक्त एकदा स्पर्शून बघ.
आणि सांग मला,
शहरी इमल्यांची आठवण येते का? - ll १ ll
किल्ल्यांवरच्या पठारांवर
एकदा रात्री पहुडून बघ,
पौर्णिमेचं पिठूर चांदणं
स्वतःच्या अंगावर पांघरून बघ.
आणि सांग मला,
पंचतारांकीत हॉटेल ची आठवण येते का? - ll २ ll
बाजी-तान्याचे पोवाडे
रायगडावरनं गाऊन बघ,
देवराईतली राउळघंटा
एकदा सांजवेळी वाजवून बघ.
आणि सांग मला,
डी.जे. च्या धिंगण्याची आठवण येते का? - ll ३ ll
खळाळणा-या झ-यात
फक्त जरा बसून बघ,
कोसळता धबधबा
तुझ्या पाठीवर जरा झेलून बघ.
आणि सांग मला,
रिसॉर्टमधल्या कृत्रिम धबधब्याची आठवण येते का? - ll ४ ll
कड्यावरच्या ठाकरांकडल्या
चहाचे भुरके मारुन बघ,
धनगराच्या झापात बसून
धारोष्ण दूध पिऊन बघ.
आणि सांग मला,
पेप्सी, कोक, सेव्हन अप ची आठवण येते का? - ll ५ ll
सारवलेल्या जमिनीवर बसून
केळीच्या पानात जेवून बघ,
चुलीवर भाजलेली कांदाभाकरी
एकदा जरा चाखून बघ.
आणि सांग मला,
मॅकडोनाल्डच्या बर्गर ची आठवण येते का? - ll ६ ll
रानांमधनं धावणा-या
वाटांवरनं जरा बागडून बघ,
मऊ ओल्या हिरवळीवरनं
उघड्या पायांनी चालून बघ.
आणि सांग मला,
इटालियन मार्बलच्या टाईल्स ची आठवण येते का? - ll ७ ll
प्रतिष्ठेच्या क्षणभंगूर कवचातून
जरा बाहेर येऊन बघ,
निसर्गाच्या संगीतावर
आयुष्याची बासरी वाजवून बघ.
आणि सांग मला,
स्वतः ची तरी आठवण उरते का? - ll ८ ll
No comments:
Post a Comment